
संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्यात अखेर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा चालक रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू याचाही यात समावेश आहे. मात्र, मंदिराचे मुख्य कारभारी असलेले चंपत राय यांचे नाव एफआयआरमधून वगळण्यात आले आहे.
राममंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ट्रस्टने या प्रकरणी तक्रार दाखल केली तर उत्तर प्रदेश सरकारने चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. एसआयटीने 150 लोकांची चौकशी केली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर चौकशीचा प्राथमिक अहवाल नुकताच सादर केला.
गुन्हा कोणावर?
देणगी घोटाळ्याप्रकरणी रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, रमाशंकर मिश्रा, सुभाष, करुणेश आणि लवकुश मिश्रा यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या आठ जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली चोरी, गुन्हेगारी कट, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दानपेटीतील सात कोटींवर डल्ला
दानपेटीतून 7 ते 7.5 कोटींची चोरी झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या एका आमदाराने सर्वप्रथम केला होता. त्यानंतर विरोधी पक्षातील इतरही नेत्यांनी आरोप केले. रामाच्या नावावर राज्य करणाऱ्या भाजपच्या काळातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली.
एसआयटीच्या अहवालात होते नाव
एसआयटी अहवालात चंपत राय, डॉ. अनिल मिश्रा आणि गोपाळ राव यांच्यासह ट्रस्टचे 17 पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. चंपत राय हे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. सर्वाधिक आरोप त्यांच्यावरच झाले होते.































































