
एकीकडे ऑनलाइन सर्चिंग करून ‘ॲमेझॉन’वरून खाद्यपदार्थ मागवण्याचे फॅड वाढले असतानाच याच ॲमेझॉनच्या भिवंडी येथील गोदामात मुदत संपून गेलेले (एक्सपायर्ड) अन्नपदार्थ विकले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाने या गोदामावर छापा मारून दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
भिवंडीच्या सरवली येथे ‘ॲमेझॉन’ रिटेल इंडियाचे गोदाम आहे. या गोदामातील मुदत संपलेले अन्नपदार्थ कायदेशीररित्या विल्हेवाट न लावता ते आर. के. ट्रेडर्स यांच्याशी संगनमत करून पुन्हा बाजारात विकण्यासाठी पाठवले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा या गोदामावर छापेमारी करण्यात आली. ॲमेझॉन रिटेल इंडियाचे पश्चिम क्षेत्राचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नर यांच्याशी संगनमत करून ॲमेझॉनमधील मुदत संपलेले खाद्यपदार्थ आर. के. ट्रेडर्सचे मालक रहेमान के हे पुन्हा साखळी विक्रीतून ग्राहकांना विकत असल्याचे उघड झाले.
अन्नपदार्थ विल्हेवाटीचे बोगस प्रमाणपत्र
गंभीर बाब म्हणजे खराब व कालबाह्य खाद्यपदार्धांची विल्हेवाट लावणे कायद्याने बंधनकारक असतानाही तसे न करता ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू होता. प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी या खाद्यपदार्धांची विल्हेवाट लावल्याचे बोगस प्रमाणपत्रही आर. के. ट्रेडर्सने बनवून घेतल्याचे उघड झाले. याप्रकरणी सोमशेखर बसवराज कोन्नर आणि रहेमान के. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोनगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष बोराडे करत आहेत.


























































