
वसई न्यायालयातील महिला न्यायाधीशाने असभ्य भाष्य केल्याचा आरोप एका महिला वकिलाने केला आहे. या महिला वकिलाने याची रीतसर तक्रार करणारे पत्र मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींना धाडले आहे.
एका प्रकरणात या महिला वकिलाने या महिला न्यायाधीशासमोर अर्ज केले. त्यातील दुरुस्तीवरून या महिला न्यायाधीशाने असभ्य भाष्य केले. भरकोर्टात सर्वांसमोर महिला न्यायाधीशाने केलेले हे भाष्य अयोग्य आहे. तसेच दुसऱ्या वकिलाचा अशाच प्रकारचा अर्ज या महिला न्यायाधीशाने स्वीकारला. महिला न्यायाधीशाचे हे वर्तन पक्षपाती आहे. मुख्य न्यायमूर्तींनी याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी महिला वकिलाने पत्रात केली आहे.
सीसीटीव्हीत घटना कैद
या महिला न्यायाधीशाच्या कोर्टात सीसीटीव्ही आहेत. घटना घडली तेव्हा सीसीटीव्ही कार्यरत होते की नाही हे माहीत नाही. मात्र घटनेची सत्यता सीसीटीव्हीत तपासता येईल. या घटनेचे त्यावेळी कोर्टात उपस्थित असलेले वकीलही साक्षीदार आहेत, असेही या पत्रात नमूद आहे.





























































