
कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी मुंबईहून मडगावला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस शनिवारी निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने धावली. सकाळी 8.24 वाजता निर्धारीत वेळेत कुडाळ रेल्वे स्थानकावर पोचणारी कोकणकन्या एक्सप्रेस तब्बल नऊ तास उशिराने सायंकाळी 5.39 वाजता कुडाळ रेल्वेस्थानकात पोचली. ही गाडी उशिराने धावल्याने प्रवाशांना रखडत रखडत प्रवास करावा लागला. मडगावला जाणारी गाडी उशिरानेच धावल्याने परत रात्री मडगावहून मुंबईला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेसही उशिराने धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री अकरा वाजता सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने सुटली. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास सुटलेली गाडी कुडाळ रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी 5.39 वाजता दाखल झाली. ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकात क्रॉसिगसाठी गाडी थांबविल्यामुळे या गाडीला आणखी विलंब झाला. गाडी सुटण्यास उशिर का झाला? याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहीती देण्यात आली नाही.




























































