
उत्तर प्रदेशातील सहारनपूरजवळ डेहराडून-पंचकुला महामार्गावर शुक्रवारी एक अत्यंत भीषण अपघात झाला. एका सुसाट वेगाने येणाऱ्या बोलेरो कारने (SUV) टाटा टियागो कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही अपघाताची घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातादरम्यान कारची धडक इतकी तीव्र होती की SUV कार रस्त्यावरील दुभाजकावर आदळून पूर्णपणे चक्काचूर झाली, तर बोलेरो कारहीही उलटली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील बहादूरगढ येथील रहिवासी होते. हे सर्वजण कारने हरिद्वारच्या दिशेने जात होते. रामपूर मनिहारन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर त्यांनी कार रिव्हर्स (मागे) घेण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान मागून येणाऱ्या वेगवान बोलेरो ने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि क्षणार्धात होत्याच नव्हत झालं.
या अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख पटली असून, चरण सिंग, त्यांची पत्नी सुदेश, सून प्रीती आणि नातू शिवांश अशी मृतांची नावे आहेत. तर प्रवीण, सहदेव आणि अन्य एक जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले आणि सर्व पीडितांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कुटुंबातील चारही सदस्यांना मृत घोषित केले, तर तिन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली असून, बोलेरो चालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. अतिवेग आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, या अपघाताच्या सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.




























































