
उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षणाची विभागणीचा डाव उधळून लावण्यासाठी मंगळवारी उपवर्गीकरण विरोधी पुनर्विलोकन समितीचा प्रचंड मोर्चा मुंबईत विधिमंडळावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमापासून सुरू होऊन विधिमंडळावर धडकणार असून या मोर्चात बौद्ध, ढोर, होलार, मातंग, चर्मकार यांसह अनुसूचित जातींमधील हजारो समाजबांधव सहभागी होणार आहेत.
अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेस ताबडतोब स्थगिती द्यावी व न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा या मागण्यांसाठी चर्मकार समाजाच्या वतीने हा धडक मोर्चा काढण्यात आला आहे. बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, चर्मकार समाजाचे नेते, माजी मंत्री बबनराव घोलप, राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने, ऍड. सुरेश माने, माजी मंत्री राजकुमार बडोले हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चामध्ये संजय भालेराव, प्रतीक कांबळे, राहुल डंबाळे, विलास रुपवते, सागर संसारे, अशोक कांबळे, आशीष गाडे आदी सहभागी होणार आहेत.




























































