
आमदारांचे पीए आणि वाहनचालकांचे मानधन आता वाढणार आहे. यामध्ये पीएचे मानधन ३० हजारांवरून ४० हजार, तर वाहनचालकांचे २० हजारांवरून ३० हजार रुपये होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सध्या स्वीय सहाय्यकांना दरमहा ३० हजार रुपये, तर वाहनचालकांना २० हजार रुपये मानधन दिले जाते. अनेक वर्षांपासून या मानधनात वाढ झालेली नसल्याने स्वीय सहाय्यकांचे मानधन ४० हजार रुपये आणि वाहनचालकांचे मानधन ३० हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी समर्थन दिले. यासंदर्भातील प्रस्ताव गेल्या मार्च महिन्यापासून प्रलंबित असून विधिमंडळ सचिवालयाने तो संसदीय कार्य विभागाकडे पाठविला होता. मात्र, विविध त्रुटींचा उल्लेख करून हा प्रस्ताव वारंवार परत पाठविण्यात आल्याची माहिती सदस्यांनी दिली. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.





























































