
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत पिछाडीवर पडलेल्या हिंदुस्थानी संघासमोर आता ‘जिंका किंवा मरा’ची लढाई उभी ठाकली आहे. ब्रिस्टॉल येथे होणारा चौथा सामना गमावल्यास २०१८-१९ नंतर प्रथमच ‘टीम इंडिया’वर सलग दोन द्विपक्षीय टी-२० मालिका गमाविण्याची नामुष्की ओढावेल. दुसरीकडे, फॉर्मात असलेल्या इंग्लंडला पाच सामन्यांची ही मालिका आधीच खिशात घालण्याची संधी आहे.
नॉटिंगहॅममधील तिसऱ्या सामन्यातील दारुण पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला होता. ‘फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांतील आमची कामगिरी भयानक होती,’ अशा शब्दांत त्याने संघाच्या खेळावर ताशेरे ओढले. सूर्यकुमार यादवकडून नेतृत्व स्वीकारल्यानंतर अय्यरला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघावरचा विश्वास कायम ठेवला आहे. ‘एकाच पराभवामुळे संघ वाईट ठरत नाही. नॉटिंगहॅममध्ये खेळलेल्या संघातील सात खेळाडूंनी चार महिन्यांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध टी-२० विश्वचषक जिंकला होता,’ असे गंभीर यांनी स्पष्ट केले.
याउलट हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ जबरदस्त लयीत आहे. गेल्या उन्हाळ्यात जोस बटलरकडून नेतृत्व स्वीकारल्यानंतर इंग्लंडने पूर्ण झालेल्या २१ पैकी १८ सामने जिंकले आहेत. हिंदुस्थानविरुद्धची पुरुषांची टी २० मालिका इंग्लंडने आजवर कधीच जिंकलेली नाही. त्यामुळे यावेळी इतिहास घडवण्याची संधी त्यांच्याकडे आहे.
इंग्लंडचा फिरकीपटू लियाम डॉसन हा प्रशिक्षक आणि कर्णधाराचा विश्वासू खेळाडू असला, तरी हिंदुस्थानच्या डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध त्याचा प्रभाव मर्यादित राहिला आहे. त्यामुळे जेम्स कोल्स या डावखुऱ्या फिरकीपटूकडेही इंग्लंडचे लक्ष आहे. हिंदुस्थानकडून शिवम दुबेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. डरहममधील पावसामुळे रद्द झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने नाबाद ४२ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांत तो अपयशी ठरला. नॉ टिंगहॅममध्ये त्याला आठव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णयही चर्चेचा विषय ठरला. आता ब्रिस्टॉलमधील त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील.
संघात बदलाची शक्यता
इंग्लंड विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी विजयी संघात कोणताही बदल करण्याच्या मनःस्थितीत नाही. हिंदुस्थानकडे मात्र संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यांश शेडगे, रवि बिश्नोई आणि प्रसिध कृष्णा हे राखीव पर्याय उपलब्ध आहेत. सलामीनंतर डावखुऱ्या फलंदाजांची मालिका खंडित करण्यासाठी अतिरिक्त उजव्या हाताच्या फलंदाजाला संधी मिळू शकते. तसेच वरच्या फळीचे अपयश लक्षात घेता, वॉशिंग्टन सुंदरलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.



























































