Nanded News – हिमायतनगर शहरातील नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले नामांकित खासगी कोचिंग क्लासेसचे संचालक, शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले एन. टी. जाधव यांनी दि. १० जुलै रोज शुक्रवारी सकाळी ३.३० वाजता धक्कादायक पाऊल उचलत आपल्या खासगी ट्युशनच्या परिसरातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण हिमायतनगर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सकाळच्या सुमारास काही नागरिकांना ट्युशन परिसरातील चिंचेच्या झाडाला जाधव हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. याची माहिती तात्काळ हिमायतनगर पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक, माजी विद्यार्थी, पालक आणि परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी घटनास्थळी गर्दी केली. एन. टी.जाधव हे अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविले होते. शांत, संयमी आणि विद्यार्थ्यांप्रती आपुलकीची भावना जपणारे शिक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी भूखंड व्यवहाराशी संबंधित वाद असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या शाळेची मान्यता रद्द झाल्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र या सर्व बाबींना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचे खरे कारण शोधण्यासाठी सर्व शक्य त्या अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे. मयताच्या कुटुंबीयांचे जबाब, जवळील व्यक्तींची चौकशी, मोबाईल कॉल रेकॉर्ड, तसेच इतर संबंधित बाबींची पडताळणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेने हिमायतनगर शहरातील शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, विद्यार्थ्यांसह सर्व स्तरांतून एन. टी. जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.