ठाण्यात दोन घरे कोसळली; एक ठार, दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घोडबंदरच्या आझादनगर येथील मद्रास चाळीतील दोन घरे आज दुपारी साडेतीन वाजता अचानक कोसळली. या घटनेत एकजण ठार झाला असून दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव चाळीमधील ३ घरे रिकामी करण्यात आली असून जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने धोकादायक इमारती व चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.

आझादनगर येथील ब्रह्मांड परिसरात मद्रास चाळ आहे. या चाळीमधील तळ अधिक एक असे अंदाजे ३० वर्षे जुने घरे होते. त्या घराचा गॅलरीचा काही भाग बाजूला असलेल्या घरावर पडला होता. दरम्यान घरामध्ये तीन व्यक्ती झोपल्या होत्या, बाजूच्या घराचा भाग त्या तीन व्यक्तींच्या अंगावर पडला. उर्मिला जयस्वाल (३५), विनित जयस्वाल (९) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जयकुमार जयस्वाल (१२) याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

भिवंडीत घराचा सज्जा पडला

खंडुपाडा परिसरातील एक मजली घराचा सज्जा आज सकाळी ८ वाजता कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असून एकजण किरकोळ जखमी झाला आहे. घटनास्थळी आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत बाजूची घरे रिकामी केली आहेत. दरम्यान धोकादायक इमारती आणि चाळीतील घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सीवूड्समध्ये छत पडून एक जखमी

नवी मुंबई : सीवूड्स येथील सेक्टर ४८ मधील साई प्रसाद सोसायटीतील एका घराच्या छताचा भाग अचानक कोसळल्याने सुरेश साळुंखे हे गंभीर जखमी झाले. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी या अपघातामुळे इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. घटनेनंतर परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.