
देशातील तरुणांच्या प्रश्नावर 19 दिवसांपासून उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना देशभरातून पाठिंबा मिळत आहे. बॉलीवूड कलाकारांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनीच वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला आहे. येत्या 20 जुलै रोजी संसदेवर काढल्या जाणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याची तयारीही सर्वांनी दाखवली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी संसदेवरील मोर्चात शेतकऱ्यांना ट्रक्टरसह उतरवण्याची घोषणा आज केली.
वांगचुक यांच्या उपोषणाला 19 दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारचा एकही प्रतिनिधी वांगचुक यांच्याशी चर्चा करण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचलेला नाही. या अहंकारी भूमिकेविरोधात देशात संताप आहे. त्यातून वांगचुक यांना पाठिंबा वाढत आहे. अनेक मान्यवरांनी आज वांगचुक यांची भेट घेतली. आपचे नेते अरविंद केजरीवाल, सपाच्या खासदार डिंपल यादव, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जंतरमंतरवर जाऊन वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अभिनेते सयाजी शिंदे, सोनाक्षी सिन्हा, आकांक्षा सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना पाठिंबा दिला. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी वांगचुक यांना पाठिंबा म्हणून एक दिवसाचे उपोषण केले.
वांगचुक यांचे वजन 9 किलोने घटले
उपोषण सुरू केल्यापासून वांगचुक यांचे वजन 9 किलोंनी घटले आहे. त्यांचा रक्तदाब 101/65 एमएमएचजी, ऑक्सिजन पातळी 98 टक्के आणि रक्तातील साखरेचे प्रमाण 89 एमजी/डीएल असल्याचे आढळून आले. ते पूर्णपणे शुद्धीवर असले तरी सलग 19 दिवस अन्न न खाल्ल्यामुळे त्यांचे शरीर खूप अशक्त झाले आहे.

































































