
लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटनांबरोबरच तिकीट तपासनीस (टीसी) आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रकार वाढले आहेत. अधूनमधून टीसींवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्याच्या हेतूने पश्चिम रेल्वेने ठोस पाऊल उचलले आहे. तिकीट तपासणीच्या कारवाईचे ‘फुटेज’ मिळवण्यासाठी पुढील महिनाभरातच टीसींना बॉडी कॅमेरे असलेली स्पेशल जॅकेटस् दिली जाणार आहेत. जॅकेटवरील बॉडी कॅमेऱ्यांमुळे टीसींसोबत वाद घालणाऱ्या प्रवाशाची ओळख पटवणे शक्य होणार आहे. त्याआधारे संबंधित प्रवाशावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
उपनगरी रेल्वे मार्गावर टीसींना मारहाण करण्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वादावादी, हाणामारीचे प्रकार अधिक घडतात. अशा घटनांतील प्रवासी आणि टीसी या दोघांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करण्यासाठी बॉडी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या ‘नमस्ते’ अभियानांतर्गत बॉडी कॅमेऱ्यांच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर 800 हून अधिक टीसी आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून टीसींना बॉडी कॅमेरे असलेले स्पेशल जॅकेटस् पुरवण्यात येणार आहेत. पुढील 45 दिवसांतच अर्थात ऑगस्ट महिनाअखेरीपर्यंत टीसींना बॉडी कॅमेऱ्यांची स्पेशल जॅकेट दिली जातील, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी 2 ऑगस्ट रोजी बोरिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवेळी संतप्त झालेल्या प्रवाशाने टीसीवर हल्ला केला होता. त्या हल्ल्याच्या घटनेनंतरच रेल्वे प्रशासनाने बॉडी कॅमेऱ्यांचा समावेश असलेली स्पेशल जॅकेट खरेदी करण्याच्या कार्यवाहीला गती दिली होती.
संपूर्ण वादावादीचे ‘रेकॉर्डिंग’ होणार
महागड्या किमतीच्या बॉडी कॅमेऱ्यात साधारण चार ते पाच फुटांपर्यंतचे छायाचित्र आणि आवाज रेका@र्ड होणार आहे. तिकीट तपासणीच्या कारवाईवेळी टीसी प्रवाशांसोबत कशाप्रकारे वागत आहे, कारवाईला सामोरे जाताना प्रवासी कोणत्या पद्धतीने उत्तरे देत आहेत, प्रवाशांच्या हालचाली कशा आहेत, टीसींमार्फत बेकायदेशीररीत्या पैसे मागण्याचा प्रयत्न होतोय का… आदी सर्व गोष्टींवर बॉडी कॅमेऱ्यांच्या सहाय्याने पाळत ठेवली जाणार आहे. कॅमेऱ्यात पैद होणारे फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येणार आहे.



























































