विद्यार्थ्यांचा हिरमोड, सेट परीक्षा पुन्हा लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहायक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा येत्या 6 सप्टेंबर रोजी होणार होती. परंतु, याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) होणार असल्याने सेट परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सेट परीक्षा 27 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्यासाठी प्राधिपृत विभाग आहे. सेट विभाग हा राज्य शासनाची समन्वयक संस्था, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र, गोवा राज्यात सेट परीक्षा आयोजित केली जाते. त्यानुसार 41वी सेट परीक्षा 26 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, 26 जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सरळसेवा भरतीअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध विषयांच्या परीक्षा असल्याने उमेदवारांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित राहता येऊन त्यांचे नुकसान होईल. आता 6 सप्टेंबर रोजी सीबीएसईची सीटीईटी या परीक्षेमुळे पुन्हा एकदा सेट परीक्षेची तारखी बदलली.

7 ते 26 जुलै या कालावधीत आषाढी वारी असल्याने वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि उमेदवारांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे 26 जुलै रोजीची सेट परीक्षा पुढे ढकलून 6 सप्टेंबर ही संभाव्य तारीख घोषित करण्यात आली होती.