
‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या एका प्रेयसीने प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये ठेवल्याची भयंकर घटना कल्याण पूर्वेतील अडिवली-ढोकाळी येथील निलकंठ सोसायटीत उघडकीस आली आहे. प्रियकराची हत्या केल्यानंतर मृतदेह लवकर कुजावा तसेच रक्तासह इतर महत्त्वाचे पुरावे नष्ट व्हावेत यासाठी बाथरूमचा नळ सलग सुरू ठेवला. या फ्लॅटमधून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे तसेच आरोपी महिलेने घरमालकाला पाठवलेल्या व्हॉईस मेसेजमुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला. या घटनेनंतर निर्दयी प्रेयसी फरार झाली असून तिच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक कोलकात्याकडे रवाना झाले आहे.
कल्याण पूर्वेतील निलकंठ सोसायटीत हमीदुल्ला इस्लाम आणि त्याची प्रेयसी नफिसा इस्लाम हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. हमीदुल्ला हा बिगारी कामगार होता. सध्या राहात असलेला फ्लॅट अडगळीचा असल्याने हमीदुल्ला आणि नफिसा यांनी घरमालकाकडून फ्लॅट बदलूनही मागितली होता. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या घराला टाळे होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजारच्या रहिवाशांनी घरमालकाकडे केली.
नफिसाचा व्हॉईस मेसेज आला आणि उलगडा झाला
दरम्यान कोलकात्याला फरार झालेल्या नफिसाने घरमालकाला एक व्हॉईस मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये तिने हमीदुल्लाची हत्या केल्याची कबुली दिली. मृतदेह बाथरूममध्ये ठेवला आणि नळही चालू ठेवल्याचे तिने सांगितले. त्यानंतर हादरलेल्या घरमालकाने तत्काळ पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी येऊन टाळे तोडले व घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना बाथरूममध्ये एका पोत्यात हमीदुल्लाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. बाथरूमचा नळही सतत वाहत होता. त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
हत्या का केली? गूढ कायम
नफिसाने हमीदुल्लाची हत्या का केली याचे गूढ कायम आहे. तिच्या तपासासाठी डोंबिवली पोलिसांचे विशेष पथक कोल कात्याकडे रवाना झाले आहे. मृतदेह आणि परिसराची फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तपासणी केली असून त्यातून महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे, असा विश्वास मानपाडा पोलिसांनी व्यक्त केला.





























































