लव्हलिनाने हिंदुस्थानसाठी केले पदक निश्चित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी आपले पहिले पदक निश्चित केले आहे.ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनला पुढची चाल मिळाल्याने तिने थेट उपांत्य फेरीत प्रवेश करून आपले पदक निश्चित केले आहे. बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत पराभूत होणाऱया दोन्ही बॉक्सर्सना कांस्य पदक मिळते. याचा अर्थ ग्लासगोमध्ये आपली पहिली लढत खेळण्यापूर्वीच लव्हलिनाचे कांस्य पदक निश्चित झाले आहे.

लव्हलिनाच्या गटात फक्त 5 बॉक्सर

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी लव्हलिना महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट पोहोचली आहे. स्पर्धेत फक्त पाच खेळाडू होत्या. त्यामुळे लव्हलिनासह त्यापैकी तिघी थेट उपांत्य फेरीत पोहोचल्या, तर उर्वरित दोघींना उपांत्यपूर्व फेरीचा एकच सामना खेळावा लागला.

उपांत्य फेरीत तफाकीविरुद्ध लढत

दोन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रिकाम्या हाताने परतल्यानंतर लव्हलिना 31 जुलै रोजी उपांत्य फेरीत तफाकीविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, जिथे तिला सुवर्णपदकाच्या सामन्यात स्थान मिळवण्याची संधी असेल. विजय मिळवल्यास ती अंतिम फेरीत पोहोचेल आणि तिचे किमान रौप्यपदक निश्चित होईल. या लढतीत पराभव झाल्यासही तिला कांस्यपदक मिळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील हे तिचे पहिले पदक असेल. लव्हलिना गोल्ड कोस्ट 2018 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत गतविजेती सँडी रायनकडून पराभूत झाली होती. त्याचबरोबर बार्ंमगहॅम 2022 मध्ये तिने आपला पहिलाच सामना गमावला होता. मागील दोन्ही स्पर्धांमध्ये तिने 69 किलो वजनी गटात भाग घेतला होता.

लव्हलिनाला ध्वज आणि मशाल वाहनाचा मान

या पदकामुळे लव्हलिनाने पात्र असलेल्या सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. लव्हलिनाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि 2023 च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. याव्यतिरिक्त तिने चीनमधील हांगझू येथे झालेल्या 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. गुरुवारी होणाऱया उद्घाटन सोहळय़ात लव्हलिना आणि टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू ध्वज आणि मशाल घेऊन धावतील.