
<< सौरभ बेंद्रे
[email protected]
एखाद्या चित्रकाराने चितारलेलं चांगलं चित्रं पाहताना मनाची एक निराळी अवस्था होते. मनात विविध भावभावना प्रचलन पावतात आणि त्यातून एक वेगळा कलानुभव येतो. मुंबईतल्या पार्ल्यातील तरुण कला-इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ व लेखक संदीप दहिसरकर याचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘A Couple of Different Strokes‘ नावाचं इंग्लिश कॉफी-टेबल बुक वाचताना व पाहताना हाच कलानुभव आला.
विनायक व प्रेमा पाठारे या चित्रकार दांपत्याच्या आयुष्यावर सखोल संशोधन व अभ्यास करून लिहिलेल्या आणि अनेक चित्रप्रतिमांनी नटलेल्या या नितांतसुंदर ग्रंथाला ज्येष्ठ चित्रकार श्री. सुहास बहुळकर यांची तितकीच अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे, मग माझ्यासारख्या रसिकाने त्यावर अधिक काय लिहावं? तर वर म्हटल्याप्रमाणे या पुस्तकातून मला जो कलानुभव आला तो शब्दांद्वारे इतरांशी सार्ध करावा एवढाच या लेखाचा उद्देश आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या आणि कला शिक्षण घेतलेल्या विनायक पाठारे आणि प्रेमा सुभेदार या दोन चित्रकारांनी एकमेकांना आयुष्याचे जोडीदार म्हणून निवडलं आणि लग्नानंतर संसार सांभाळतानाच दोघांनीही कलेशी स्वतची निष्ठा कायम राखत अखंडपणे उत्कृष्ट कलानिर्मिती केली आणि कला संस्थांमध्ये प्रशासकीय कार्याद्वारे योगदान दिलं ही मोठी लक्षवेधी गोष्ट आहे. भारतातील विरळ अशा या चित्रकार दांपत्याचा आजच्या कला जगताला विसर पडणे हा एक प्रकारे अन्याय असून संदीपच्या पुस्तकामुळे काही प्रमाणात तरी त्याचं परिमार्जन झालंय.
पुस्तकाच्या नावातील Couple या शब्दातच एक छान श्लेष आहे. सामान्य व्यवहारानुसार शीर्षकाचा ‘एखाददोन अनोखे फराटे’ असा मर्यादित अर्थ प्रथमदर्शनी होतो, पण पाठारे दांपत्याच्या कारकीर्दीचा व आयुष्याचा संदीपने घेतलेला शब्दरूप आणि चित्ररूप आढावा पाहिल्यावर लक्षात येतं की, इथे Couple शब्दाचा ‘दांपत्य’ असा दुसरा जास्त महत्त्वाचा अर्थ अभिप्रेत आहे. या Couple ने म्हणजेच पाठारे दांपत्याने आयुष्याच्या कॅनव्हासवर खरंच अनोखे स्ट्रोक्स रेखाटलेले जाणवतात.
कला शिक्षण घेतल्यावर वयाच्या पंचविशीत विनायक यांनी मित्रांसोबत मुंबई ते दिल्ली सायकलवरून प्रवास करत वाटेत चित्रं रेखाटायची एक धाडसी मोहीम आखली. ऐन वेळेस इतर सहचित्रकर्मींनी माघार घेतली, पण विनायक यांनी कष्टाने पैसे कमवून सायकल मिळवली आणि जानेवारी 1935 मध्ये मुंबईहून सायकलवरून ते एकटेच या धाडसी सफरीवर निघाले. त्यांनी पार पेशावरपर्यंत सफर केली. या सफरीत त्यांनी निसर्गचित्रं, स्थिर चित्रं रेखाटली. नामवंत व्यक्तींची भेट घेत त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटली, त्यांना चित्रं विकली. परिसराचा, समाजाचा व लोक संस्कृतींचा अनुभव घेतला आणि ऑगस्ट 1935 मध्ये ते मुंबईला परतले. विशेष म्हणजे परतल्यावर ‘विहार’ साप्ताहिकात एका लेखमालेद्वारे त्यांनी या सफरीतील अनुभव नोंदवून ठेवले. हा कला जगताकरिता एक बहुमोल दस्तऐवजच असून अशा प्रकारची धाडसी मोहीम एकट्याने यशस्वी करणारे विनायक पाठारे आधुनिक भारतातील एकमेव लोकविलक्षण चित्रकार ठरावेत. संदीपने अत्यंत कष्टपूर्वक संशोधन करून या सफरीच्या महत्त्वाच्या तपशिलांचा आणि उपलब्ध चित्रांचा पुस्तकात समावेश केला आहे, जे या पुस्तकाचं एक आकर्षण आहे.
प्रेमा सुभेदार यांनी कला शिक्षण घेतलं आणि त्या सिद्धहस्त चित्रकार बनल्या. 1941 साली विनायक यांच्याशी लग्न झाल्यावर त्या सौ. प्रेमा पाठारे झाल्या. दोघांनीही श्री. एस. एल. हळदणकर यांच्या चित्रकला संस्थेतून कला शिक्षण घेतलं होतं.
लग्नानंतर विनायक यांनी व्यक्तिचित्रणावर, तर प्रेमाताईंनी निसर्ग चित्रणावर लक्ष केंद्रित केलं. 50 वर्षांहून अधिक काळ दोघांनी यशस्वी संसार केला, दोन्ही मुलांना आर्किटेक्ट बनवलं आणि आपली कला कारकीर्दही साधली. दोघांनी काढलेल्या अनेक चित्रांचा समावेश संदीपच्या पुस्तकात आहे ही बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे.
विनायक पाठारे यांच्या वैयक्तिक लेटरहेडवर घारापुरी येथील त्रिमूर्तीचे चित्र आणि त्याखाली असलेली ‘सत्यम शिवम सुंदरम’ ही अक्षरं आपल्याला पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आणि मलपृष्ठाच्या आतील बाजूस दिसतात, तर त्यासंबंधी पाठारे यांची कलाविषयक तात्त्विक भूमिका लेखामध्ये वाचायला मिळते.
सबंध पुस्तकभर संदीपच्या अभ्यासपूर्ण लेखनाची आणि वेचक कलासक्त नजरेची छाप स्पष्ट दिसते. पाठारे यांचे धाकटे चिरंजीव श्री. शिरीष पाठारे यांच्या पुढाकाराने, त्यांच्या सक्रिय व आर्थिक सहयोगातून आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या योगदानातून हे पुस्तक आकाराला आलं आहे हे नोंदवणं आवश्यक आहे.
पाठारे यांची चित्रं, त्यांनी लिहिलेली पत्रं, त्यांना मिळालेले मानसम्मान, वर्तमानपत्रांतील कात्रणं इत्यादींतून तो काळ आणि त्यातील घटना, समाज, व्यक्तिमत्त्वं आपल्या समोर सजीव होतात आणि आपल्याला एक निराळा अनुभव देतात. रसिकांना असा अनोखा अनुभव देतानाच कलेच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज संदीपने कलात्मक पद्धतीने मांडला आहे, हे निश्चितच कौतुकस्पद आहे. मला वाटतं की, संदीप दहिसरकरच्या `A Couple Of Different Strokes‘ या पुस्तकाशिवाय आजच्या कुठल्याही कलारसिकाचा ग्रंथसंग्रह पूर्ण होणार नाही!
A Couple Of Different Strokes
(English Coffee-table Book)
लेखक ः संदीप दहिसरकर
प्रकाशक ः पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठे ः 246 ? किंमत ः रु. 2,500/-

























































