होर्मुझमध्ये मोठी दुर्घटना! सागरी सुरुंगाला धडकल्याने तेलवाहू जहाजाचा भीषण स्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होर्मुझच्या सामुद्रधुनीत रविवारी मोठी दुर्घटना घडली. सागरी सुरुंगाला धडकल्याने एका तेलवाहू जहाजाचा स्फोट झाला. इराणी मीडियाच्या माहितीनुसार, हे जहाज इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत निश्चित केलेल्या सागरी मार्गापासून भरकटले अन् सुरुंगाला धडकले. यानंतर जहाजाचा स्फोट झाला. मात्र इराणी अधिकाऱ्यांकडून या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, हे जहाजाची ओळख, ते कोणत्या देशाचे होते, जहाजात किती कर्मचारी होते, त्याचे गंतव्यस्थान याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. तसेच जहाजाच्या स्फोटाच्या कारणाचीही पुष्टी झालेली नाही.

होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण सागरी मार्गांपैकी एक मानली जाते. सौदी अरेबिया आणि कुवेतसह प्रमुख आखाती तेल-उत्पादक देशांमधून येणारे कच्चे तेल आशिया, युरोप आणि जगभरातील इतर बाजारपेठांमध्ये पोहोचण्यासाठी या सामुद्रधुनीचा वापर होतो. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून आखाती प्रदेशात इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढत आहे. यामुळे जगातील सर्वात व्यस्त ऊर्जा व्यापार मार्गांपैकी एकावरील सागरी वाहतुकीत गंभीर व्यत्यय आला आहे.