
अमेरिका आणि इराण यांच्यातील अलीकडील लष्करी तणावामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू असून, प्रशासनाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अमेरिकन खासदार थॉमस मॅसी यांनी ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर जोरदार आक्षेप घेतला असून, या संघर्षामुळे अमेरिका लक्षणीयरीत्या कमकुवत झाली आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. या संपूर्ण मोहिमेतून इस्रायलला सर्वाधिक फायदा झाला असून अमेरिकेला मात्र मोठी किंमत मोजावी लागली आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपली भूमिका मांडताना मॅसी म्हणाले की, इराणसोबतच्या या युद्धामुळे अमेरिकेची जागतिक ताकद कमकूवत झाली आहे. या संघर्षकाळात देशाच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेवर प्रचंड ताण आला, तेलसाठ्यांमध्ये घट झाली आणि अमेरिकन लष्करी जवानांचे आयुष्य धोक्यात आले. याशिवाय, सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले, सरकारी कर्जात भर पडली आणि देशांतर्गत गरजांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले, असे सांगत त्यांनी हे सर्व केवळ इस्रायलच्या हितासाठी केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील प्रत्यक्ष लष्करी हल्ले सध्या थांबले असले तरी दोन्ही देशांमधील तणाव पूर्णपणे संपलेला नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या विविध मध्यस्थांच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये गुप्त संदेशांची देवाणघेवाण सुरू आहे. दुसरीकडे, अमेरिकेचा शस्त्रसाठा वेगाने कमी होत असल्याच्या माध्यमांमधील चर्चा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहेत. अमेरिकेजवळ गरजेपेक्षा कितीतरी अधिक लष्करी संसाधने उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
BREAKING
Thomas Massie:
“The US has been significantly weakened by the war with Iran.”
“This administration depleted our missile defenses, drained our oil reserves, sacrificed our men & women, inflated the price of consumer goods, increased our debt…”
“ALL FOR ISRAEL.” pic.twitter.com/JzaMkhQXXn
— sarah (@sahouraxo) July 26, 2026
दुसऱ्या बाजूला, वेस्ट बँक भागात इस्रायली लष्कराच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक परिसरांमध्ये छापे टाकणे, नागरिकांना अटक करणे आणि घरे पाडण्याचे सत्र तीव्र झाले आहे. त्यातच लाल समुद्रात हुथी बंडखोरांच्या वाढत्या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक देखील मंदावली असून, यामुळे या संपूर्ण प्रदेशातील सुरक्षा आणि व्यापाराबाबत जागतिक चिंता अधिक वाढली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची मध्यपूर्वेतील भूमिका आणि परराष्ट्र धोरणाबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

























































