उत्तराखंडमध्ये पावसाचे धुमशान; चारधाम यात्रा पुढील दोन दिवसांसाठी स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळाधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी राज्यातील अनेक भागांत भूस्खलन होऊन रस्ते बंद झाले आहेत. या घटनांमुळे खबरदारी म्हणून प्रसिद्ध चार धाम यात्रा दोन दिवसांसाठी म्हणजे मंगळवारी 28 जुलै आणि बुधवारी 29 जुलै रोजी स्थगित करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. गढवालचे आयुक्त आनंद स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून ही यात्रा मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस थांबवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे यात्रेचे रस्ते अनेक ठिकाणी दरडी कोसळून बंद झाले आहेत. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर आणि रस्ते पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्राच्या (SEOC) माहितीनुसार, सध्या राज्यातील 76 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. राज्यातील बंद असलेल्या रस्त्यांमध्ये एका राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे 12 आणि पीएमजीएसवायचे 63 ग्रामीण रस्ते आहेत. पिथोरागढ, डेहराडून, टिहरी, उत्तरकाशी, बागेश्वर आणि चमोली हे जिल्हे सर्वाधिक फटका बसला आहे.