
हिंदुस्थानात सक्तीच्या करण्यात आलेल्या ‘E20 पेट्रोल’ ( इथेनॉल मिश्रण) धोरणाविरोधात जनता आक्रमक झाली आहे. नागरिकांना 100 टक्के पेट्रोल खरेदी करण्याचा कायदेशीर पर्यार उपलब्ध व्हावा, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांच्या यशस्वी आंदोलनानंतर आता E20 पेट्रोल विरोधातही जनता रस्त्यावर उतणार आहे.
सरकारच्या या नव्या धोरणामुळे जुन्या गाड्यांचे मायलेज (इंधन क्षमता) वेगाने घटत असून वाहनांच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत, म्हणजेच 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान राजधानी दिल्लीत तीन मोठी आंदोलने होणार असून यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष आणि ट्रान्सपोर्ट युनियन्स मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
तहसीन पूनावाला यांचे ‘गाडी मार्च, गांधी मार्च’ -31 जुलै
प्रसिद्ध राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला आणि ‘टीम भारत’ या नागरिक समूहाने 31 जुलै रोजी दिल्लीत शांततापूर्ण ‘गाडी मार्च’ची घोषणा केली आहे. हा मार्च इंडिया गेटपासून सुरू होऊन संसद भवन मार्गापर्यंत असेल. या दरम्यान हा मोर्च केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरदीप सिंह पुरी यांच्या निवासस्थानाजवळून व कार्यालयाजवळून जाणार आहे.
अरविंद केजरीवाल यांचे ‘नॅशनल टाउनहॉल’- 1 ऑगस्ट
आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 1 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एका ‘नॅशनल टाउनहॉल’चे आयोजन केले आहे. या मंचावर तज्ज्ञ, सर्वसामान्य आणि E20 इंधनामुळे नुकसान झालेले नागरिक एकत्र येणार आहेत. E20 पेट्रोल मागे घेण्यासाठी किंवा ते ऐच्छिक करण्याची मागणी याद्वारे सरकारकडे केली जाणार आहे.
दिल्ली ट्रान्सफोर्ट सेक्टरचा संसद मोर्चा – 4 ऑगस्ट
दिल्लीच्या परिवहन क्षेत्रानेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनसह विविध युनियन्सनी ४ ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे.
डीपफेक प्रकरणी गुगलविरुद्ध 11 कोटींचा दावा
इथेनॉल-मिश्रित ई-20 इंधन धोरणाशी संबंधित डीपफेक आणि एआय वापरून सोशल मीडियावर केलेल्या बदनामी प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायकोर्टात एक्स, मेटा, गुगल व अन्य काही जणांविरोधात 11 कोटींचा दावा दाखल केला आहे. बदनामीकारक सामग्री सोशल मीडियावरून हटवण्यात यावी, अशी मागणी गडकरी यांनी केली असून हायकोर्टाने त्यांच्या दाव्यावर 5 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे.
डीपफेक प्रकरणी गुगलविरुद्ध 11 कोटींचा दावा, गडकरी यांच्या अर्जावर 5 ऑगस्टला सुनावणी

























































