अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मोठा झटका, बनावट पासपोर्ट प्रकरणात ७ वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी चेन्नईस्थित सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्याला ५५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. फसवणूक, बनावट ओळख वापरणे आणि खोटी कागदपत्रे सादर करून पासपोर्ट मिळवणे या आरोपांखाली छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले आहे. सद्यस्थितीत तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात असून, एका वेगळ्या प्रकरणात तो आधीपासूनच जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

सीबीआयने या प्रकरणाची नोंद १९ मार्च २००२ रोजी केली होती. या प्रकरणाच्या तपासात उघड झाले होते की, छोटा राजनने विजया कदम या नावाने पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि चेन्नईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदुस्थानी पासपोर्ट मिळवला होता. यासाठी त्याने शाळेचा ट्रान्सफर सर्टिफिकेट, रेशन कार्ड आणि डिमांड ड्राफ्ट यांसारखी अनेक खोटी कागदपत्रे जमा केली होती.

सीबीआयच्या तपासात हे देखील निष्पन्न झाले होते की, विजया कदम या नावाने पासपोर्ट घेणारी व्यक्ती प्रत्यक्षात मुंबईचा रहिवासी असलेला राजेंद्र ऊर्फ नाना ऊर्फ छोटा राजन हाच होता. त्याने आपली खरी ओळख लपवून वय आणि पत्त्याशी संबंधित बनावट कागदपत्रे खरी भासवून पासपोर्ट मिळवला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने २२ जानेवारी २००४ रोजी छोटा राजनविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणावर प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर आता चेन्नईच्या सीबीआय न्यायालयाने आपला निर्णय देत त्याला ७ वर्षांची शिक्षा आणि दंडाचा आदेश दिला आहे.