
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या लोकभवनच्या नावे बनावट लेटरहेड, खोटे शिक्के आणि बनावट स्वाक्षऱयांचा वापर करून रेल्वेच्या व्हीआयपी कोटय़ातून तिकिटे मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱया आंतरराज्यीय टोळीचा मालबार हिल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून मोठय़ा प्रमाणात बनावट कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
लोकभवन कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरहेड तयार करून त्यावर खोटय़ा स्वाक्षऱया व शिक्के वापर करत रेल्वेच्या व्हीआयपी कोटय़ातून तिकिटे मिळवून दिले जात होते. हा प्रकार समोर येताच रेल्वे प्रशासानाने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर मालबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मग तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेश, गुजरात आणि मुंबई येथे कारवाई करून टोळीतील सहा आरोपींना अटक केली. तपासादरम्यान मुख्य आरोपीविरुद्ध यापूर्वीही कुर्ला व मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यांत अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
आरोपींकडून 32 मोबाईल, एक लॅपटॉप, 16 सिमकार्ड, 50 क्रेडिट व डेबिट कार्ड, 500हून अधिक व्यक्तींच्या रेल्वे बुकिंगशी संबंधित गोपनीय माहिती, बनावट शिक्के, आधार कार्ड तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अमरिश ठक्कर (41) या मुख्य आरोपीसह तारिक खान (33), दीपक कुमार यादव (26), विनय रावत (24), सागर ठक्कर (32) आणि शत्रुंजय यादव (34) अशी आरोपींची नावे आहेत.




























































