कर्जमुक्तीच्या प्रसिद्धीवर 10 कोटींची उधळपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाचा प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धी करण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यातून वर्तमानपत्र, टीव्ही माध्यम, एफएम रेडिओ, यूटय़ुब, इंस्टाग्राम अशा समाजमाध्यमांतूनही या योजनेची प्रसिद्धी केली जाणार आहे.

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफीसाठी आर्थिक तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. आता या योजनेची व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत माध्यम आराखडा राबवण्यास व त्यासाठी येणाऱया 9 कोटी 99 लाख 78 हजार 800 रुपयांच्या खर्चास सहकार विभागाने मान्यता दिली आहे. या योजनेची माहिती दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्त वाहिन्या, मराठी मनोरंजन वाहिन्या, पाँडकास्ट, हार्ंडग्ज, रेल्वे स्टेशनवरील एलईडी स्क्रीन, एसटी महामंडळाची बस स्थानके, डिजिटल मीडियाद्वारे शेतकरी व जनतेसमोर नेली जाईल.

‘ग्राम विकास’ची दोन कोटींची जाहिरातबाजी

राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत या योजनेअंतर्गत झालेल्या कामांची व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी 1 कोटी 97 लाख रुपयांचा प्रसिद्धी माध्यम आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने या खर्चास आज वित्तीय मान्यता दिली आहे.