
सिंधुरत्न योजनेअंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर हाऊसबोट प्रकल्पाला मिळणारा अल्प प्रतिसाद लक्षात घेऊन जयगड येथील दोन हाऊसबोट भाट्ये समुद्रकिनारी आणून त्याठिकाणी हाऊसबोट टर्मिनल सुरू करण्यात येणार आहे. दाभोळ खाडीतील हाऊसबोट प्रकल्प सुरू राहणार असून त्याठिकाणी तिन्ही हाऊसबोट कायम राहणार आहेत.
सिंधुरत्न योजना आणि रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या वतीने केरळच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात हाऊसबोट सुरू करण्यात आल्या होत्या. जयगड खाडीत दोन हाऊसबोट आणि दाभोळ खाडीत दोन हाऊसबोट सुरू करण्यात आल्या होत्या. या सर्व हाऊसबोट प्रभाग संघांना चालवण्यासाठी देण्यात आल्या होत्या. गुहागरसाठी पाचवी हाऊसबोट देण्यात आली असून त्या हाऊसबोटचे उद्घाटन बाकी आहे. ही हाऊसबोट दाभोळ खाडीच्या एका टोकाला राहणार आहे. हाऊसबोटला सुरुवातीपासून अल्प प्रतिसाद मिळाला होता. हाऊसबोटचे शुल्क अफाट/प्रचंड असल्यामुळे पर्यटकांनी त्याकडे पाठ फिरवली. हाऊसबोटवर ८ तासांसाठी रूमचे भाडे ८ हजार रुपये आहे, तर २२ तासांसाठी १५ हजार भाडे आकारण्यात येते. बोटच्या अप्पर डेकवर तीन तासांसाठी ६९९ रुपये भाडे आहे.





























































