मुद्रा- नवोन्मेषी सक्षम प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंजली महाजन

‘आयआयटी’चा विद्यार्थी नसतानाही दुर्गम भागात शिक्षण घेणारा पृथ्वीराज, ज्याने यशाचा प्रवास सार्थ ठरवत ‘एनव्हिडिया’च्या ‘डीप लर्निंग’ टीममध्ये स्वतचे स्थान तयार केले आहे.

आजच्या स्पर्धात्मक तंत्रज्ञान विश्वात जागतिक दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कोटय़वधी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवण्यासाठी ‘आयआयटी’सारख्या नामांकित संस्थेची पदवी आवश्यक मानली जाते. मात्र, कर्नाटकातील एका दुर्गम गावातून आलेल्या पृथ्वीराजने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेचा शिक्का नसतानाही केवळ स्वतच्या कौशल्याच्या, सातत्यपूर्ण मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्याने जगातील आघाडीची चिप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कंपनी ‘एनव्हिडिया’मध्ये तब्बल 2.6 कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह स्थान मिळवले आहे.

सध्या पृथ्वीराज ‘एनव्हिडिया’च्या ‘डीप लर्निंग’ टीममध्ये कार्यरत आहे. ही टीम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगाला गती देणाऱया अत्याधुनिक संगणकीय चिप्स आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर काम करते. एका दुर्गम गावातून जागतिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी पोहोचणे ही त्याच्या प्रवासाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे.

पृथ्वीराजने बेंगळुरू येथील ‘पीईएस युनिव्हर्सिटी’मधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. तो ‘आयआयटीटचा विद्यार्थी नसला तरी कॉलेजच्या काळात त्याने केवळ अभ्यासक्रमापुरते स्वतला मर्यादित ठेवले नाही. विविध तांत्रिक प्रकल्प, इंटर्नशिप, ओपन-सोर्स उपक्रम आणि स्वतहून नवीन तंत्रज्ञान शिकण्यावर त्याने भर दिला. उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करत त्याने स्वतची वेगळी ओळख निर्माण केली.

त्याचा प्रवास मात्र मुळीच सोपा नव्हता. चित्रदुर्ग जिह्यातील ज्या गावातून तो आला, तेथे काही वर्षांपूर्वीपर्यंत दर्जेदार इंटरनेट आणि तंत्रज्ञानाची सुविधाही मर्यादित होती. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पूर्ण करताना आर्थिक अडचणी आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला अमेरिकेतील तुलनेने सामान्य श्रेणीतील (टियर-3) विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागला. प्रवेश प्रक्रिया, अभ्यास, करीअर नियोजन आणि नोकरीची तयारी या सर्व टप्प्यांवर त्याने स्वतच मार्ग शोधला. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर त्याने ‘एनव्हिडिया’ची अत्यंत कठीण निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार केली. आज तो वर्षाला सुमारे 2 लाख 75 हजार अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच जवळपास 2.6 कोटी रुपयांचे वार्षिक मानधन मिळवत आहे.

या यशाबद्दल बोलताना पृथ्वीराज म्हणतो, ज्या गावात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कल्पनाही कठीण होती, तिथून जगातील सर्वोत्तम अभियंत्यांसोबत काम करण्यापर्यंतचा प्रवास सुरुवातीला अशक्य वाटत होता. प्रत्येक अपयश, प्रत्येक संघर्ष आणि स्वतबद्दल निर्माण झालेली शंका याच गोष्टींनी मला अधिक सक्षम बनवले. आज ‘एनव्हिडिया’मध्ये काम करणे म्हणजे माझे स्वप्न साकार झाल्यासारखे आहे.

 जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आता केवळ पदवीचा ब्रँड किंवा संस्थेचा दर्जा पाहत नाहीत; उमेदवाराची प्रत्यक्ष कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता, नवोन्मेषी विचार आणि प्रात्यक्षिक अनुभव यांनाच अधिक महत्त्व देत आहेत. त्यामुळे योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिकण्याची तयारी असेल तर कोणतीही पार्श्वभूमी यशाच्या आड येऊ शकत नाही.