
‘विक्रम गायकवाड लेगसी अवॉर्ड्स’चा शुभारंभ गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर करण्यात आला. दिवंगत राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ रंगभूषाकार कै. विक्रम गायकवाड यांच्या गुरू-शिष्य परंपरा, कलात्मक उत्कृष्टता, नम्रता आणि आजीवन शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाला अभिवादन म्हणून श्रीकांत देसाई, तन्वी विक्रम गायकवाड आणि ज्योत्स्ना गायकवाड यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली.
पहिल्या वर्षाच्या या सोहळ्यात अशोक गावस, प्रदीप पेमगीरीकर, सुरेंद्र साळवी आणि भाग्यलक्ष्मी पाडया या ज्येष्ठ कलाकारांना ‘जीवनगौरव सन्मानाने’ गौरविण्यात आले.
स्पर्धात्मक पुरस्कारांमध्ये ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी धनंजय प्रजापती यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम रंगभूषाकार, ‘जारण’ चित्रपटासाठी सौरभ कापडे यांना मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम रंगभूषाकार, तर ‘सैयारा’ चित्रपटासाठी पूजा गुप्ता यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम केशभूषाकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ‘छावा’ चित्रपटातील उल्लेखनीय कार्यासाठी श्रीकांत देसाई यांना ‘विशेष तांत्रिक सन्मान’ प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री व निर्माती ऋतुपर्णा सेनगुप्ता, आमदार संजय पांडे, आणि ‘धसाळ’ चित्रपटाच्या लेखिका, दिग्दर्शिका व सहनिर्माती वरुणा राणा यांची प्रमुख उपस्थिती होती.



























































