महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात भाजपचे ब्रिजभूषण शरण सिंग यांची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील राउज अव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी एका महत्त्वाच्या निकालात, भाजपचे माजी खासदार आणि हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह तसेच सहआरोपी विनोद तोमर यांची महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांना दोषमुक्त केल्याचे स्पष्ट केले आहे.

जंतरमंतर येथे महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत 15 जून 2023 रोजी सुमारे 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सिंह हे महासंघाचे प्रमुख असताना त्यांनी हिंदुस्थान आणि परदेशात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी ब्रिजभूषण सिंह हे मागील तीन वर्षांपासून जामीनावर बाहेर होते.

न्यायालयाच्या या निकालानंतर एका वाहिनीशी बोलताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, ‘ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले होते, त्याच दिवशी मी म्हटले होते की, आरोप सिद्ध झाल्यास मी आत्महत्या करेन. आज न्यायालयाने माझी सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे, जे व्हायचं होतं ते झालं.’