
वसई गुन्हे शाखेने केलेल्या धाडसी कारवाईत सुमारे 2 कोटी 5 लाख 80 हजार रुपये किमतीचे 2 किलो 58 ग्रॅम व्हेल माशाची उलटी(अंबरग्रीस) जप्त करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय नागरिक न्याय संहिता (BNSS) तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:15 च्या सुमारास वसईतील जी.जी. कॉलेज परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित आरोपी अंबरग्रीसची खरेदी-विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून 2 किलो 58 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस), एक चारचाकी वाहन, पाच मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच इतर साहित्य असा एकूण 2,05,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात संबंधित आरोपी व्हेल माशाची उलटी बेकायदेशीर खरेदी-विक्री करण्याच्या उद्देशाने व्यवहार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. उदीत सातवसे (38), कृष्णकांत देसाई (34), विशाल ठाकरे (28), अकिल पिव्ही (28) व सुहाद कोया (32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
व्हेल माशाची उलटी हा संरक्षित सागरी प्राण्याशी संबंधित अत्यंत दुर्मिळ पदार्थ असल्याने त्याची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित आहे. या कारवाईत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत वसई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव पवार अधिक तपास करीत आहेत.































































