10 फूट झाडे असलेल्या वनक्षेत्रात मेंढ्यांच्या चराईला मुभा, मेंढपाळांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि चराईचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुकास्तरावर प्रांताधिकारी आणि वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्या स्तरावर विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

ज्या वनक्षेत्रात आठ ते दहा फूट उंचीची झाडे वाढलेली आहेत, अशा ठिकाणी मेंढपाळांना चराईसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार असून, मेंढपाळांवरील जुने गुन्हे मागे घेण्याचे व नवीन गुन्हे दाखल न करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या समितीमध्ये मेंढपाळ प्रतिनिधींचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. चराईसाठी योग्य जागांची निवड करणे, नियमावली ठरवणे आणि मार्गदर्शक सूचना तयार करणे ही या समितीची मुख्य जबाबदारी असणार आहे.