
हिंदुस्थानी वायुदलाचा (आयएएफ) एक विंग कमांडर पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती उघड केल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी यासंबंधी आता माहिती दिली असून संबंधित अधिकाऱ्यावर शासकीय गुप्तता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
हे प्रकरण फक्त एका अधिकाऱ्यापुरते मर्यादित नसून यामागे एक मोठी गुप्तचर साखळी कार्यरत असल्याचा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंदुस्थानी लष्कर आणि सुरक्षा दलाशी निगडित महत्त्वाची सामरिक माहिती मिळवणे हा या साखळीचा उद्देश असू शकतो, असाही पोलिसांना संशय आहे.
पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांनी रचलेल्या ‘हनी ट्रॅप’ला विंग कमांडर बळी पडल्याचा दावा करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या अधिकाऱ्याने एका सहकाऱ्याच्या मोबाईलचे नियंत्रण मिळवण्यासाठी त्यात डेटा चोरणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले होते. हिंदुस्थानी हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने या प्रकरणाशी संबंधित माहिती दिल्ली पोलिसांना पुरवल्यानंतर ३१ मे रोजी या विंग कमांडरला अटक करण्यात आली.



























































