पाच लाख हिंदुस्थानींवर टांगती तलवार, नोकरी गेल्यावर एच-1बी व्हिसाधारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एच-1बी व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी कामगारांच्या अडचणी वाढू शकतात. नोकरी गमावल्यानंतर नवीन नोकरी शोधण्यासाठी मिळणारी 60 दिवसांची सवलत मुदत (ग्रेस पीरियड) रद्द करण्याचा विचार अमेरिकन सरकार करत आहे. या नियमाचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेत एच-1बी व्हिसावर काम करणाऱ्या अंदाजे 5 लाख हिंदुस्थानींवर होऊ शकतो. नवीन नियम लागू झाला तर नोकरी गमावल्यानंतर अमेरिकेत वास्तव्य करणे कठीण होईल.

हा प्रस्ताव सध्या ‘व्हाईट हाऊस’च्या ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेट (ओएमबी) कडे पाठवण्यात आला आहे. हा नियम अद्याप लागू झालेला नाही. या वर्षी मे महिन्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माकाx रुबियो यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. नवीन इमिग्रेशन प्रणाली स्वीकारताना काही अडचणी आणि तणाव निर्माण होऊ शकतात, हे रुबियो यांनी मान्य केले. त्यांच्या मते, अमेरिका गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावरील अवैध स्थलांतराच्या समस्येशी झुंजत आहे. 20 दशलक्षांहून अधिक लोकांनी अमेरिकेत अवैधपणे प्रवेश केला आहे आणि या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी हे बदल केले जात आहेत.

नवीन नोकरी मिळाली नाही तर काय…

नवीन नोकरी शोधणे हा एकमेव पर्याय नाही. काही प्रकरणांमध्ये, कर्मचारी दुसऱ्या व्हिसा किंवा दर्जासाठीदेखील अर्ज करू शकतो. उदाहरणार्थ, विशिष्ट अटींनुसार, ते डिपेंडंट (आश्रित) किंवा व्हिजिटर (अभ्यागत) दर्जासाठी अर्ज करू शकतात. जर ते आधीच ग्रीन कार्डसाठी पात्र असतील, तर काही पर्याय उपलब्ध असू शकतात.

…तर मायदेशी जा

जर कर्मचाऱ्याला 60 दिवसांच्या आत नवीन नोकरी मिळाली नाही आणि त्याने आपला दर्जा बदलण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, तर त्याला अमेरिका सोडून जाण्यास भाग पाडले जाऊ शकते. विशेषतः जर अमेरिकेतील त्यांचा वाढीव मुक्काम संपला असल्यास अमेरिका सोडावी लागते.

 जर एखाद्या एच-1बी व्हिसाधारक कर्मचाऱ्याची नोकरी गेली, तर त्याला लगेच अमेरिका सोडण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या नियमांनुसार, त्यांना जास्तीत जास्त 60 दिवसांची मुदत दिली जाते. या काळात ते नवीन नोकरी शोधू शकतात किंवा अमेरिकेतील आपला दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलू शकतात.