
राँग साईडने वाहने चालवणाऱ्या रायडर्सना ठाणे वाहतूक पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी दणका दिला आहे. शिळ-महापे रोड तसेच डोंबिवली-कल्याणफाटा मार्गावर दोन दिवसांत २२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. काही दिवसांपूर्वी ३० वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान बेदरकारपणे स्वतः सह इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने बेसिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवत सर्रास विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम सुरूच आहे. सकाळी गर्दीच्या वेळेत शिळ-महापे रोड आणि डोंबिवली ते कल्याणफाटा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. याचा फटका नियमित मार्गाने जाणाऱ्या वाहनांना बसतो. याबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती बॅनर लावून वाहनचालकांना विरुद्ध दिशेने वाहने न चालवण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र त्यानंतरही नियमांची पायमल्ली सुरूच असल्याने नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
ना हेल्मेट, अल्पवयीन चालकांवर कारवाई
ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा वाहतूक उपविभाग तसेच शिळ-डायघर पोलिसांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवली. त्यासोबतच विना हेल्मेट, अल्पवयीन वाहनचालक, ट्रिपल सीट तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल नऊ बेशिस्त दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



























































