एआर रहमान यांच्या मुलाचा भीषण अपघात; पोर्श कार आणि व्हॅगन-आरची धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान यांचा मुलगा आणि पार्श्वगायक ए. आर. आमीन याचा 10 ऑगस्ट सोमवारी पहाटे चेन्नईच्या गिंडी परिसरात एक कार अपघात झाला. ऑलिंपिया टेक पार्क सिग्नलजवळ पोर्श कार आणि व्हॅगन-आरची धडक बसल्याने आमीन आणि त्याचा मित्र किरकोळ जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर दोघांनाही डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले, तर पोलिसांनी पहाटे झालेल्या या अपघाताच्या तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 3 वाजून 30 च्या सुमारास गिंडी येथील ऑलिंपिया टेक पार्क सिग्नलजवळ ए. आर. आमीन आपल्या मित्रासोबत कारमधून प्रवास करत असताना हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे गिंडीच्या दिशेने जात असताना एका बाजूच्या रस्त्यावरून येणाऱ्या व्हॅगन-आरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले, मात्र आमीन किंवा त्याच्या मित्राला कोणतीही मोठी दुखापत झाल्याचे वृत्त नाही.  अपघातानंतर, आमीन आणि त्याच्या मित्राला कावेरी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्या किरकोळ जखमांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. या अपघातात व्हॅगन-आरमधील एक प्रवासीही जखमी झाला होता आणि त्याला उपचारासाठी कलाइग्नार सेंटेनरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्यालाही घरी सोडण्यात आले.