
कालबाह्य झालेल्या अन्नसाठयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी तो अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज अमेझॉनला दिले. तसेच याचा खर्च अमेझॉनने करावा असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.
भिवंडीतील अॅमेझॉन रिटेल इंडियाच्या गोदामातून कालबाह्य झालेला अन्नसाठा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याऐवजी किरकोळ बाजारात पाठवण्यात येत असल्याने एफडीएने गोदामाचा अन्न परवाना रद्द केला. अमेझॉनच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सोमवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी हे पदार्थ कायद्यानुसार वैज्ञानिक पद्धतीने नष्ट करावेत. या प्रक्रियेचा संपूर्ण खर्च अमेझॉनने करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
































































