
वरळी येथील महापालिकेच्या मालकीची सेंच्युरी टेक्सटाईल अॅण्ड इंडस्ट्रीजची ३८२२ चौ.मी. जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. या जागेसाठी पेडर रिअॅलिटी लिमिटेड या कंपनीने १३५१ कोटी रुपयांची बोली लावली आहे. ही बोली सर्वाधिक ठरल्यानंतर तिची निवड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे.
विकास आराखडा २०३४ नुसार महापालिकेच्या मालकीचा वरळी येथील न. भू. क्र. १५४६ (भाग) निवासी क्षेत्रात असून, त्यातील काही भाग मैदान, महापालिका शाळा आणि मनोरंजन मैदानासाठी आरक्षित आहे. या भूखंडाच्या काही भागावर ई.ओ. एस. २.६ अंतर्गत मनोरंजन मैदानाची सुविधा आहे. ही सुविधा रद्द करण्यासाठी कार्यवाही महापालिकेतर्फे सुरू आहे. ती रद्द झाल्यानंतरच पेडर रिअॅलिटीला स्वीकृती पत्र देण्यात येणार आहे.
भूखंडावरील पात्र रहिवाशांचे पुनर्वसन
या प्रस्तावानुसार भूखंडावरील पात्र रहिवाशांचे पुनर्वसन केले करण्यात येईल. विकासकाला पात्र निवासी कुटुंबाला ३७.६३ चौ.मी. म्हणजे ४०५ चौरस फूट चटई क्षेत्रफळाचे घर द्यावे लागेल. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तीन वर्षांत पुनर्वसन करावे लागेल. तसेच व्यावसायिक गाळेधारक आणि महापालिका शाळेचेही पुनर्वसन करावे लागेल.
पेडर रिअॅलिटी कंपनी ठरली पात्र, सुधार समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी येणार
भाडेकराराची वैशिष्ट्ये या निविदा प्रक्रियेत मे. शापूरजी पालोनजी, मे. कीस्टोन रिअॅलिटी, के. रहेजा कॉर्प आणि पेडर रिअॅलिटी चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील तीन कंपनांच्या निविदा अ- प्रतिसादात्मक ठरल्यानंतर पेडर रिअॅलिटीची निविदा २५ मे २०२६ रोजी उघडण्यात आली. ही निविदा १३५१ कोटी रुपयांची होती. ही रक्कम महापालिकेने निश्चित केलेल्या १,३४८ कोटी रुपयांच्या आधारभूत किमतीपेक्षा ०.२२ टक्के जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
भूखंडाचा सुरुवातीला ३० वर्षांचा भाडेकरार करण्यात येणार असून त्यानंतर आणखी ३० वर्षांसाठी त्यावेळच्या अमलात असलेल्या धोरणानुसार भाडेकराराचे नूतनीकरण केले जाणार आहे.
पेडर रिअॅलिटीला बोलीच्या ३० टक्के रक्कम म्हणजे ४०५.३० कोटी रुपये पहिला हप्ता म्हणून भरावी लागणार आहे. उरलेली ९४५.७० कोटी रक्कम स्वीकृत पत्र जारी झाल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत भरावी लागेल.

































































