
संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहातून गायब असलेले केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आज अखेर 23 दिवसांनी मौन सोडले. सभागृहातील स्वतःच्या अनुपस्थितीचे त्यांनी समर्थन केले. ‘लापता, भगोडा, भाग गये’ असे का म्हणता, असे सांगत शहा यांनी विरोधकांवर आगपाखड केली.
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंदुका चालवण्याचे आदेश कोणी दिले याचे उत्तर अमित शहांनी द्यावे अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र आंदोलन सुरू झाल्यापासून शहा संसदेत फिरकलेच नाहीत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ले चढवले व कामकाज होऊ दिले नाही. अखेर अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी शहा यांनी आज संसद भवन परिसरात मीडियाशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी प्रचंड त्रागा केला. ‘भगोडा, लापता’ अशी भाषा देशाच्या सार्वजनिक व संसदीय जीवनात हल्लीच ऐकायला येऊ लागली आहे, असे ते म्हणाले.
लोकसभा ठप्पच
अमित शहा यांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेची तयारी दाखवल्याचा कोणताही परिणाम विरोधकांवर झाला नाही. दोन्ही सभागृहांत विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दुपारी बारा व त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
लेक्चर नको, उत्तर द्या ः राहुल गांधी
अमित शहा यांच्या वक्तव्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तत्काळ पलटवार केला. ‘‘आम्हाला अमित शहा यांचे लेक्चर ऐकण्यात रस नाही. विद्यार्थ्यांवर बंदुका चालवण्याचे आदेश कुणी दिले? विद्यार्थ्यांना खिळ्यांच्या लाठीने मारण्याचे आदेश कुणी दिले? या प्रश्नांचे उत्तर देशाला आणि देशातील तरुणाईला हवे आहे. शहांनी हे आदेश दिले असतील तर ते गुन्हेगार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. हे आदेश त्यांनी दिले नसतील तर ते अकार्यक्षम आहेत. त्यासाठी त्यांनी राजीनामा द्यायला हवा,’’ असे राहुल गांधी म्हणाले. फाटलेल्या फुग्यात शेवटच्या क्षणी हवा भरण्याचा प्रयत्न होतोय, पण शहांमध्ये हिंमत नाही हे देशाला दिसलेय, असा टोला राहुल यांनी हाणला.
नीट आंदोलनासह सर्व मुद्दय़ांवर बोलायला मी तयार आहे. विरोधकांनी चर्चेच्या मागणीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना द्यावे. सभागृहात चर्चा सुरू करावी. त्या चर्चेला मी उत्तर देईन. काही लोक म्हणतात की, तुम्ही विद्यार्थ्यांवरील हल्ल्यावर निवेदन करा. अशा पद्धतीने चर्चा होणार नाही. ते तुमच्याकडे होत असेल, संसदेत तसे होत नाही! – अमित शहा






























































