
हिंदुस्थानच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार स्वागत शिवसेनेच्या वतीने केले जाणार आहे. शिवसेना भवनाच्या प्रांगणात शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता भव्य ध्वजारोहण सोहळय़ाचे आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. घरादारांवर तुळशीपात्र ठेवून असंख्य देशभक्तांनी केलेल्या या बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य चिरायु व्हावे यासाठी शिवसेना सदैव झटत आली आहे. शिवसेनेने देशाभिमान कायम जपला आहे. देशाविषयीच्या याच कृतज्ञ भावनेतून स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा झेंडा फडकवला जाणार आहे. या सोहळय़ाला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, विभागप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिकांसह देशप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत.
जेन-झी तरुणाईला उत्सुकता
शिवसेनेचा ध्वजारोहण सोहळा हे मुंबईकरांसाठी खास आकर्षण असते. तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळय़ातील वातावरण भारलेले असते. देशात नुकत्याच झालेल्या जेन-झी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा होत आहे. ‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधात जेन-झीने पुकारलेल्या आंदोलनात शिवसेनेने ठाम पाठिंबा दिला होता. शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला जेन-झीने तुफान प्रतिसाद दिला होता. शुक्रवारी मध्यरात्री होणाऱ्या ध्वजारोहण सोहळय़ाविषयीदेखील जेन-झीमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
एक देश, एक तिरंगा, एक आवाज…
एक देश, एक तिरंगा, एक आवाज… अशी साद घालत शिवसेनेने ‘एक्स’वर खास पोस्ट केली आहे. ‘स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांचा सन्मान करण्यासाठी चला, आपण सर्वजण एकत्र येऊया… स्वातंत्र्याची मशाल पेटत ठेवूया,’ असे आवाहन पोस्टमधून केले आहे.































































