
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता आणखी भयंकर वळणावर पोहोचले आहे. युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि विध्वंसक ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनने रशियाच्या विविध भागांवर तब्बल ८२२ ड्रोन डागले असून, या भीषण हल्ल्यामुळे मॉस्कोसह अनेक शहरांचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्को आणि रोस्तोव्ह यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना प्रामुख्याने लक्ष्य केले. या हल्ल्यादरम्यान मॉस्कोमधील एका विशाल वेअरहाऊसवर ड्रोन कोसळल्याने तिथे भीषण आग लागली. आगीचे लोट इतके भयंकर होते की, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई करत बहुतांश ड्रोन हवेतच नष्ट केले असले, तरी काही ड्रोन लक्ष्यावर आदळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
८२२ ड्रोनचा वापर
युक्रेनने एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रोन्सचा वापर करून रशियाच्या संरक्षण यंत्रणेवर मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. रशियन लष्कराने दावा केला आहे की त्यांनी युक्रेनचे ८२२ ड्रोन नष्ट केले आहेत. मात्र राजधानी मॉस्कोपर्यंत हे ड्रोन पोहोचल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मॉस्को आणि आजूबाजूच्या भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.






















































