महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत भाजपाची घुसखोरी, सरकारने नेमलेले पाच सदस्य संघ विचारसरणीचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या संस्थांप्रमाणेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतही (एमएमसी) भाजपने घुसखोरी केली आहे. एमएमसीच्या 14 सदस्यांपैकी 9 सदस्य हे डॉक्टरांमध्ये निवडून आलेले आहेत तर उर्वरित 5 सदस्य शासनाने नियुक्त केले आहेत. शासनाने नियुक्त केलेले हे पाच सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या गोटातील असल्याचे समजते.
एमएमसीची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या मे महिन्यात घेण्यात आली होती. वैद्यकीय क्षेत्रात राजकारण येऊ नये म्हणून विरोध करणाऱया इंडियन मेडिकल असोसिएशनमध्येही भाजपने फूट पाडल्याने आयएमएची तीन-तीन पॅनेल या निवडणुकीत उतरली होती. त्यातील एक पॅनेल हे भाजपवाल्यांशी जवळीक असलेले होते.

राज्य शासनाने एमएमसीच्या 14 नव्या सदस्यांची नुकतीच घोषणा केली. त्यात डॉक्टरांमधून निवडून आलेल्या डॉ. संतोष कदम, डॉ. संजय कदम, डॉ. निलेश निकम, डॉ. संजय देशपांडे, डॉ. सुनील इंगळे, डॉ. अनिलकुमार पाटील, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. उज्ज्वला कराड आणि डॉ. अनिल पाचनेकर या 9 सदस्यांचा समावेश आहे.

शासनाने नामनिर्देशित केलेल्या पाच सदस्यांमध्ये डॉ. अजय केणी, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. राजीव येरवडेकर आणि डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांचा समावेश आहे. यातील डॉ. राहुल कुलकर्णी हे भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे कोकण संयोजक आहेत तर डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी थेट जोडलेले नसले तरी संघाच्या नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीमबाग येथेच त्यांचे स्वतःचे रुग्णालय आहे. डॉ. येरवडेकर यांचा पुण्यातील संघ पदाधिकाऱयांमध्ये वावर असून पेंद्रातील भाजप सरकारच्या फिट इंडिया मूव्हमेंटसाठीही त्यांनी काम केले आहे. डॉ. अजय केणी आणि डॉ. प्रशांत चौधरी यांचीही भाजपवाल्यांबरोबर उठबस असल्याचे सांगितले जाते.