
हिंदुस्थानला विश्वचषक हॉकी स्पर्धेत ‘ड’ गटातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून ४-२ गोलफरकाने पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी गोल केले; मात्र उत्तरार्धात इंग्लंडने आक्रमक खेळ करत सामना हिसकावून घेतला.
हिंदुस्थानने सामन्याची सुरुवात आक्रमक केलीः मात्र पहिल्या क्वार्टरमध्ये इंग्लंडने निकोलस बँडुराच्या गोलच्या जोरावर १-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करत हिंदुस्थानला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दिलप्रीतने गोल करत हिंदुस्थानला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, तिसऱ्या क्वार्टरमध्ये चित्रच पालटले. स्टुअर्ट रशमेरेने इंग्लंडला बरोबरी करून दिल्यानंतर हेन्री क्रॉफ्टने अवघ्या चार मिनिटांत गोल करत इंग्लंडला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या क्वार्टरमध्ये बँडुराने पुन्हा गोल करत इंग्लंडचा विजय ४-२ असा निश्चित केला.






























































