
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुंबईतील प्रसिद्ध बंगला ‘मन्नत’ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. 17 ऑगस्टला मन्नत बंगल्याच्या लॉनमध्ये दोन साप आढळल्याची माहिती समोर आली आहे. साप आढळल्यानंतर परिस्थिती सुरक्षितपणे हाताळण्यासाठी सर्पमित्र आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, रात्री सुमारे 8 वाजता एका सर्पमित्राला ‘मन्नत’मध्ये दोन साप आढळल्याचा फोन आला. त्यानंतर परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी एका सापाला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. पकडलेला साप सुमारे आठ फूट लांब होता. तो ‘धामण’ अर्थात इंडियन रॅट स्नेक असल्याचे स्पष्ट झाले. धामण हा बिनविषारी साप असून, तो बंगल्याच्या आवारातील एका शिडीखाली लपलेला आढळला. साप बिनविषारी असल्याचे समजल्यानंतर ‘मन्नत’मधील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मात्र, दुसऱ्या सापाचा शोध घेण्याचे बचाव पथकाचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. परिसरातील लोकांच्या हालचालींमुळे दुसरा साप निसटून गेला. संध्याकाळ उशिरापर्यंत शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, शाहरुख खानचा ‘मन्नत लँड्स एंड’ हा बंगला मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात समुद्रकिनारी वसलेला आहे. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते अनेकदा या बंगल्याबाहेर गर्दी करत असतात. त्यामुळे साप आढळल्याची बातमी समोर आल्यानंतर या घटनेचीही चर्चा रंगली आहे.



























































