
विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक (पीए) आणि वाहनचालकांच्या मानधनात १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मानधनातील ही वाढ १ ऑगस्टपासून लागू करण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार आमदारांच्या पीएंचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये झाले आहे. जवळपास चार वर्षांनंतर ही मानधनवाढ करण्यात आली आहे. संसदीय कार्य विभागाने मानधनवाढीबाबतचा शासन निर्णय जारी केला.
महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे वेतन आणि भत्ते अधिनियम, १९५६ मधील तरतुदींनुसार विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांना त्यांचे विधिमंडळाचे प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी पीएची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. विधानमंडळ सदस्यांच्या वेतन आणि भत्ते संयुक्त समितीच्या शिफारशीनुसार पीएच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता.



























































