
सावेडीतील पत्रकार चौकात सारडा महाविद्यालयालगतच्या अंतिम भूखंड क्रमांक ‘43-अ’च्या सुधारित मोजणी नकाशातून दोन्ही बाजूंचे नैसर्गिक नाले गायब झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगर भूमापन कार्यालयाचे उपअधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून स्पष्ट निष्कर्षांसह अहवाल सादर करण्याचे आदेश भूमी अभिलेख उपसंचालक नाशिक प्रदेश यांना देण्यात आले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांच्याकडे तक्रार केली होती.
सावेडीच्या मूळ गाव नकाशामध्ये जुना सर्व्हे क्रमांक 161मधील अंतिम भूखंड क्रमांक 43-अच्या दोन्ही बाजूंनी नैसर्गिक नाले स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहेत. अहिल्यानगर मनपाच्या प्रारूप विकास आराखडय़ासोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘विद्यमान जमीन वापर नकाशात’देखील संबंधित परिसरातील नाले आणि नैसर्गिक जलप्रवाह दाखविण्यात आले आहेत. हा नकाशा अंतिम विकास आराखडय़ाचा नसून, प्रारूप विकास आराखडय़ाच्या प्रक्रियेत शहरातील विद्यमान जमीन वापर आणि भौगोलिक स्थिती दर्शविणारा नकाशा आहे. मात्र, नगर भूमापन कार्यालयाने अंतिम भूखंड क्रमांक 43-असाठी तयार केलेल्या सुधारित मोजणी नकाशामध्ये भूखंडाच्या दोन्ही बाजूंच्या नैसर्गिक नाल्यांचा स्पष्ट उल्लेख अथवा सीमांकन करण्यात आलेले नाहीत.
संबंधित भूखंडावर सध्या सुमारे 45 मीटर उंचीच्या विशेष इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सुधारित मोजणी नकाशामध्ये दोन्ही बाजूंच्या नाल्यांची नोंद न केल्यामुळे प्रत्येक नाल्यापासून नियमानुसार आवश्यक असलेले नऊ-नऊ मीटर अंतर न सोडताच बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप शेख यांनी तक्रारीत केला आहे.
यापूर्वी प्रत्यक्ष जागेवरील नैसर्गिक नाला रुंद स्वरूपात वाहत होता. मात्र, इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने या नैसर्गिक नाल्याला अरुंद नालीचे स्वरूप देऊन त्याच्या बाजूने काँक्रीटची भिंत उभी केली असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे नाल्याची मूळ रुंदी, नैसर्गिक हद्द आणि पाण्याचा प्रवाह गंभीररीत्या बाधित झाल्याचे शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे.



























































