
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पुढील महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानात १२-१३ सप्टेंबरला १८ वी ब्रिक्स परिषद होईल. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जिनपिंग हे हिंदुस्थान दौऱ्यावर येतील. याशिवाय, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन परिषदेत सहभागी होणार आहे. मात्र चीनकडून जिनपिंग यांच्या दौऱ्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
जादवपूर विद्यापीठात एबीव्हीपी-डावे भिडले
कोलकाता : जादवपूर विद्यापीठात एबीव्हीपी आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूंचे अनेक विद्यार्थी या राड्यामध्ये जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. दोन्ही विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांनी एकमेकांवर तोडफोडीचा आरोप केला आहे.
राजौरीमध्ये ढगफुटीत चार जणांचा मृत्यू
श्रीनगर : राजौरी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून यात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. डोंगराळ भागात ढगफुटीमुळे अचानक पूर आला. यामुळे काही ठिकाणी भूस्खलन झाले. जवळपास १४ वेगवेगळ्या ठिकाणी ढगफुटी झाली. राजौरी जिल्ह्यातील बसस्थानक वाहून गेले. तर अनेक वाहने पुराच्या शक्तिशाली पाण्यात वाहून गेली. घरांचेही मोठे नुकसान झाले.


























































