
कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील एडमंटन शहरात एका गुरुद्वारात चाकू हल्ल्याची खळबळजनक घटना घडली आहे. येथील ‘नानकसर गुरुद्वारा गुरसिख मंदिर’ संकुलात शुक्रवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीने हल्ला करत दोन जणांना जखमी केले. गुरुद्वारात नियोजित एका विवाह सोहळ्यापूर्वी पार पडणाऱ्या सकाळच्या प्रार्थनेदरम्यान व्यत्यय आणल्यावरून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईशान्य एडमंटनमधील 14 व्या स्ट्रीट आणि हॉर्सहिल रोडजवळील नानकसर गुरुद्वारात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गुरुद्वारात प्रार्थनेची वेळ झालेली असताना एक संशयित व्यक्ती आत शिरली आणि तिने प्रार्थनेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याच्या असामान्य वर्तनामुळे उपस्थितांच्या लक्षात आले की तो कुणी भाविक वाटत नाही. उपस्थितांनी सुरुवातीला त्याच्याशी बोलून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याला रोखण्याचा आणि ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने झटापट करण्यास सुरुवात केली. या वेळी आरोपीने जवळ असलेल्या चाकूने दोन जणांवर हल्ला केला. या झटापटीनंतर त्याला पकडून ठेवले आणि तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आले. सुदैवाने दोन्ही पीडित व्यक्ती शुद्धीवर होत्या आणि बोलत होत्या. घटनास्थळी पोहोचलेल्या एडमंटन पोलिसांनी संशयिताला तात्काळ अटक केली, तर आपत्कालीन वैद्यकीय पथकाने जखमींवर उपचार केले.
या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता आणि हा द्वेषातून केलेला गुन्हा आहे का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. या घटनेसंदर्भात कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. एडमंटनमधील नानकसर गुरुद्वारावर झालेला हल्ला धक्कादायक आहे. जखमी झालेल्या व्यक्ती आणि हादरलेल्या संपूर्ण समाजाप्रती माझ्या संवेदना आहेत. आपल्या प्रार्थनास्थळी कोणालाही असुरक्षित वाटू नये, असे सांगत त्यांनी तत्परतेने कारवाई केल्याबद्दल एडमंटन पोलीस सेवेचे आभार मानले.
दरम्यान, गुरुद्वारा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी हरमिक सेहगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यादरम्यान गुरुद्वारातील कोणत्याही मालमत्तेचे किंवा अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या शीख धर्मग्रंथांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. पहाटे घडलेल्या या हिंसक घटनेनंतरही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास विवाहाचे सर्व विधी शांततेत पार पडले.



























































