
राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरूच आहे. नीट आणि टीईटीचे पेपर फुटल्यानंतर आता नार्ंसगचाही पेपर फुटल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. परभणी येथे एका परीक्षा केंद्रावर परीक्षा पर्यवेक्षिकेने हा पेपर फोडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक केली आहे.
बहिणीला व्हॉट्सअॅपवर पाठवला पेपर
राखी चव्हाण यांनी प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो बहीण राणी चव्हण हिला पाठवला. हा प्रश्नपत्रिकेचा फोटो नेमका आणखी कोणाकोणाला पाठवण्यात आला? तो सोशल मीडियावर किती व्हायरल झाला? यामागे काही मोठे रॅकेट आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. यातून काही आर्थिक व्यवहार झाले का, इत्यादींचा तपास करण्यात येत आहे.
परभणी शहरातील इंदिरा गांधी एएनएम नार्ंसग स्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची परीक्षा सुरू आहे. 20 ऑगस्ट रोजी सकाळी जी.एन.एम. प्रथम वर्षाचा पेपर होता. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राखी चव्हाण यांनी परीक्षा सुरू झाल्यानंतर लगेच प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले आणि ते व्हॉट्सअॅपवरून पाठवले. केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांना प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर गेल्याची शंका आली. त्यांनी राखी चव्हाण यांची चौकशी केली तसेच त्यांच्याकडील मोबाईलची तपासणी केली. मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मठपती यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून नानल पेठ पोलिसांत राखी चव्हाण, राणी चव्हाण, प्रतीक्षा किरण खिल्लारे, ईश्वर बाराबोईना आणि दिलीप बोरकर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना जामीन देण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे. आरोपींकडील मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून त्यातील माहितीचे विश्लेषण करण्यात येत आहे.
परीक्षा गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर नियम
परीक्षांमध्ये कॉपी, प्रश्नपत्रिका बाहेर पाठविणे किंवा समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका प्रसारित करणे यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर नियम आहेत. मात्र खुद्द पर्यवेक्षिकेनेच पेपरचा फोटो काढून बहिणीला पाठवला. जीएनएम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो अशा पद्धतीने व्हायरल करण्यात आल्यानंतर परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था आणि प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.





























































