
‘वंदे मातरम’च्या कथित अपमानावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना लक्ष्य करणाऱया भाजपचे नेते व उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी राष्ट्रगीताचा घोर अवमान केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रगीत सुरू असताना ते मधेच सोडून महाना हे गाडीत बसून निघून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस व आम आदमी पक्षाने यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे पोलिसांनी प्रोटोकॉल म्हणून महाना यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर लगेचच राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र राष्ट्रगीत पूर्ण व्हायच्या आधीच महाना यांनी तिरंग्याला सलामी दिली आणि चौथऱयावरून उतरून चालू लागले. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि सुरक्षा रक्षकही होते. त्यानंतर महाना थेट कारमध्ये बसून निघून गेले. व्हायरल व्हिडिओ ‘एक्स’वर पोस्ट करत काँग्रेसने भाजपवर हल्ला केला. ही भाजपची बोगस देशभक्ती आहे, अशी टीका काँग्रेसने केली. तर राष्ट्रगीताचा अपमान करणाऱया महानांवर भाजप काय कारवाई करणार, असा सवाल ‘आप’ने केला आहे.


























































