
दगडखाणीशी संबंधित जीएसटी (GST) आणि रॉयल्टी प्रकरण निकाली काढण्यासाठी ४० लाखांची लाच मागणाऱ्या सीजीएसटी (CGST) च्या लाचखोर अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक व अन्य एकाला सीबीआयने (CBI) अटक केली आहे. अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती, अधीक्षक राकेश कुमार सिन्हा व मध्यस्थ नरेंद्र राजपूत अशी या तिघांची नावे आहेत.
दगडखाणीचा जीएसटी आणि रॉयल्टीशी संबंधित वाद मिटवून प्रकरण बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांनी १ कोटी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती ४० लाख रुपये देणे निश्चित करण्यात आले. याप्रकरणी तक्रार मिळताच सीबीआयने सापळा रचून मध्यस्थाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तपासात अधीक्षक आणि अतिरिक्त आयुक्तांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
झाडाझडतीत घबाड सापडले
सीबीआयने लाचखोरांच्या निवासस्थानांवर छापेमारी केली. या झाडाझडतीदरम्यान सीबीआयला ४३ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ९० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असे घबाड सापडले.





























































