
>> अरुण
नुकताच अमेरिका आणि कॅनडाच्या दौऱयाचा योग आला. निमित्त होतं ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’तर्फे (बीएमएम) आयोजित केलेल्या सिअॅटल येथील कार्यक्रमात ‘ग्रंथाली’तर्फे आम्ही सहभागी झालो होतो. यावेळी अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या कॅनडात आठवडा घालवण्याचं ठरवलं. तिथल्या काही वैशिष्टय़पूर्ण ठिकाणांना भेटी देणं ओघानेच आलं. त्यामध्ये सीअर्स टॉवर, अटावा, टॉरेन्टो शहरं पाहाणं, शिवाय कॅनडाच्या बाजूने अधिक चांगला दिसणारा नायगाराचा धबधबा बघणं या गोष्टी होत्याच, परंतु व्हॅन्कुवर शहरात एक गमतीची गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे ‘गॅसटाऊन स्टीम क्लॉक.’ आतापर्यंत अनेकांनी, अनेक शहरातल्या उंच टॉवरची महाकाय घडय़ाळे पा]िहली असतील. वैशिष्टय़पूर्ण लंबकाची घडय़ाळं किंवा ‘ककू’ म्हणजे तासातासाला लहानशा पक्ष्याने पंख फडफडवत गुंजन करणारी घडय़ाळंसुद्धा लक्षवेधी असतात. हैदराबाद येथील सालारजंग म्युझियममधल्या विशेष घडय़ाळात तर दर तासाला एका बाजूने एक ‘माणूस’ बाहेर येतो आणि तासाचे ‘टोल’ देऊन दुसऱया बाजूने निघून जातो, अशी विस्मयकारी रचना दिसते. व्हॅन्कुव्हर शहरातल्या एका चौकातलं धूर किंवा वाफेचा ‘फवारा’ सोडणारा स्टीम क्लॉक जगप्रसिद्ध आहे. जगातल्या मोजक्या स्टीम क्लॉकपैकी ते एक. रेमन्ड सॉन्डर्स यांनी बनवलेली अशी स्टीम क्लॉक केवळ कॅनडातच नव्हे तर जपान, इंडियाना आणि ब्रिटीश कोलंबियामध्ये आहेत. अशीच टॉवर क्लॉक इंग्लंडमधील जर्सी प्रांतात आणि लंडन येथे आहेत.
हे व्हॅन्कुव्हरचं गॅसटाऊन स्टीम क्लॉक 1977 मध्ये उभारलं गेलं. कॅनडासारख्या अतिथंडीच्या देशात घरं, दुकानं वगैरे गरम ठेवण्यासाठी गरम वाफेचा वापर, पाइपने केला जातो. त्यातील जॉर्जिया व्हायाडक्टमधल्या वाफेवर गॅसटाऊन येथील स्टीम क्लॉक चालतं. हे घडय़ाळ 16 फूट उंचीचं असून खाली शिलालेखात याची माहिती कोरली आहे. हे व्हॅन्कुव्हरमधल्या 305 वॉटर स्ट्रीटवर आहे. गॅसटाऊनचं हे घडय़ाळ दर पंधरा मिनिटांनी ‘शिटी’ वाजवतं, पण 12 वाजता जास्तीत जास्त वाफ सोडतं. एरवी तोंडची वाफ दवडून वेळ वाया जातो. गॅसटाऊनच्या क्लॉकच्या ‘स्टीम’ने योग्य वेळ समजते हे महत्त्वाचं.




























































