
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या फेऱ्या सुरू आहेत. ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी सीईटी कक्षाने काही निवडक खासगी महाविद्यालयांवर निरीक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार असून, त्यात काही त्रुटी आढळल्यास महाविद्यालयांवर थेट कारवाई केली जाणार आहे.
निवडक खासगी महाविद्यालयांमधील संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी नजीकच्या शासकीय महाविद्यालयातील प्राचार्य, संचालक किंवा वरिष्ठ प्राध्यापकांची निरीक्षक (Observer) म्हणून नियुक्ती केली जाईल. हे निरीक्षक कागदपत्र पडताळणी, गुणवत्ता यादी तयार करणे, शुल्क भरणा आणि जागा वाटप यावर देखरेख ठेवतील आणि दररोज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सक्षम प्राधिकरणाकडे अनुपालन अहवाल सादर करतील.
प्रलोभनांना बळी पडू नका
विद्यार्थी व पालकांनी मध्यस्थ किंवा खासगी समुपदेशकांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, तसेच सोशल मीडियाद्वारे पसरणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहावे. त्याऐवजी विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शनासाठी सीईटी कक्षाच्या विद्यार्थी सहाय्यता केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
-
महाविद्यालयांनी संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिकेतील नियम १३ नुसारच राबवणे बंधनकारक आहे.
-
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (CAP Rounds) सर्व फेऱ्या पूर्णतः समाप्त झाल्यानंतरच कॉलेजस्तरीय प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जावी. जागांचे वाटप उमेदवारांच्या गुणवत्तेनुसारच केले जावे.
-
कॉलेजांनी आपले प्रवेश नियम, कार्यपद्धती आणि माहिती पुस्तिका त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे.
-
विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर संस्थेने तो प्रवेश तत्काळ अधिकृत ॲप/पोर्टलवर नोंदवणे, तसेच सीईटी कक्षास कळविणे बंधनकारक आहे.




























































